⚜️ *श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज जीवन चरित्र*⚜️
( भाग - १ बालपण )
⭕ *जन्म व बालपण -*
धारवाड जिल्ह्यांत बंकापूर नांवाचे एक खेडे आहे. तेथे टेंबे नावाचे एक घराणे मागील शतकात रहात होते. या घराण्यांत बऱ्याच काळापासून फडनीशी होती व ते लौकीकास पात्र ठरले होते. याघराण्याची शाखा क-हाडे व गोत्र अत्रि असे होते. या घराण्याचे वैशिष्ठ्य असे की प्रत्येक पुरुषास दोनच पुत्र होत. त्यापैकी एक संसारी व एक यति असे होते. असे हे सात पिढ्या चालले होते. महाराजांचे वडील श्रीविठ्ठलपंत हे संसारी तर विठ्ठलपंताचे बंधु यति होते. महाराज स्वत यति त्यांचे थोरले बंधु दिवाकर हे संसारी. विठ्ठलपंताच्या या यतिबंधुबद्दल एक आख्यायिका महाराजांकडून कळली. ते जंगलातच नेहमी रहात असत. फळे खाऊन, झाडपाला ओरबडून ध्यान धारणेत व अवस्थेत भ्रमण करत असत. एकदा या यतिवर जंगलात हल्ला करण्याकरिता वाघाने झडप घातली. नाही तोच यतिने केवल तिक्ष्ण दृष्टीक्षेपाने त्या वाघाकडे पाहाताक्षणीच तो वाघ जमिनीवर कोसळून मरून पडला. असे ह्या यतिचे कडकडीत वैराग्य, उदंड साधना व धगधगीत तेज होते हे यति महाराजांचे चुलते होते.
⭕ *बाल प्रभाकरांचा जन्म -*
भगवान सूर्यनारायणाचा वरप्रसाद जन्मास येणार म्हणून दश दिशास आनंदच वाटला जाणार, वायुमंद वहात असणार, वातावरण चैतन्यमय असणार यात शंकाच नाही. विठ्ठलपंताचे बऱ्याच वर्षाचे स्वप्न साकार झाले. तुळसामातेची कुस धन्य झाली. दुसरा पुत्र अवतरला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. या पुत्र दर्शनाने विठ्ठलपंत तुळसाबाई फारच आनंदली, बेहोष झाली. जन्मकृतार्थ झाला असे त्यांना वाटले पुत्रमुखावर अलौकिक तेज होते. बाळमूर्ती गुटगुटीत, गोरीपान होती. जणु बाळकृष्णाची सजीव मूर्तीच होती रिवाजाप्रमाणे या पुत्राचे नांव प्रभाकर असे ठेवले. बंकापूर धन्य झाले.
पवित्र ते कुळ पावन तो देश ।
जेथे हरीचे दास जन्म घेती ।।
बाळप्रभाकर दिवसे दिवस वाढू लागला तुळसामाता आपल्या बाळाचे कोडकौतुक करु लागली. तुळसामातेला बाळप्रभाकरावर निरतिशय प्रेम व वात्सल्य होते. पतिव्रता तुळसामातेचे भाग्य थोर म्हणून असले अलौकीक बाळ त्यांच्या उदरी जन्मास आले. कारण हा पुत्र सामान्य नव्हता.
*पुत्र व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ।*
असा पुढे जगदुद्धार करणारा व *आपण तरेल नव्हे ते नवल । कुळे उद्धरील सर्वांची तो ॥*
अशा श्रेष्ठ श्रेणीतील सत्पुरुष यति होणार .
( भाग - २ )
⚜️ *श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज जीवन चरित्र*⚜️
⭕ *आकाशवाणीतून मंत्र प्राप्ती* ⭕
मौजीबंधनाचे वेळी विजापूरच्या स्थानिक उपाध्यायाकडून गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली होती, त्याप्रमाणे त्यांचे गायत्री मंत्राचे साधन चालले होते. याच सुमारास शाळेत असतानाच त्याना आकाशवाणी होवून खालील प्रमाणे अधांतरी मंत्र लिहून दाखवले व संभाषण झाले.
"ओम श्री मन्महारामाय" हा मंत्र करशील तर श्रीराम प्रत्यक्ष माणसासारखे भेटतील "ओम श्री मन्महानारायणाय' हा मंत्र म्हणशील तर एकंदर जगाची कामें करण्याकरिता उपयोगी होईल. ''ओम ओम ओम श्री महालक्ष्म्यै नमः" हा मंत्र करशील तर अन्न, वस्त्र, निवारा व खर्चाची सोय होईल. हा मंत्र फक्त यती माणसानेच करावयाचा असून संसारिकाने नाही असे महाराज सांगत असत. वरील मंत्र कोणी दिले वगैरेची सविस्तर माहिती बालवयामुळे महाराजांना आठवत नसावी. परंतु जेवढे घडले तेवढे मात्र ते थोडक्यात सांगत. वरील मंत्र मिळाल्यावर बाळप्रभाकराने त्या मंत्राचा जप करण्यास सुरवात केली व बालपणापासूनच अशी साधनेची सुरवात झाली आणि विशेष हे की, देह त्यागाचे वेळी वरील पहिला मंत्र 'ओम श्रीमन्महारामाय' हाच जपत त्यांनी देह ठेविला.