आईच्या कुशीत असल्यासारखं वाटायचं. घरी आलं की सावत्र आई ओरडायची, काय आहे त्या झाडाखाली सारखं, घरात थांबत जा, कामं कर. कविता म्हणायची, 'आई ते झाड माझ्याशी बोलतं. माझ्याशी गप्पा मारतं. तिला एक धपाटा मारून सावत्र आई म्हणायची, 'मूर्ख आहेस, उलट त्या झाडात काहीतरी आहे, मला तर त्याची भीती वाटते. अशी झाड चांगली नसतात.' कविता जेवढी चिंचेच्या झाडावर प्रेम करायची, तेवढी तिची आई राग राग करायची. काही दिवसांनी सावत्र आईला मुलगा झाला. वडिलांना आनंद झाला. आता ते मुलाकडे लक्ष देऊ लागले. आई त्याचे खूप लाड करीत असे. कविता चिंचेच्या झाडाखाली जाऊन त्याला सांगायची, 'तू नको रागवूस आईला, ती तुला नावे ठेवते, पण मी तुला सोडणार नाही. वडील आता नवीन भावाकडे जास्त बघतात, मला कोणी नाही.' ती रडू लागायची तेव्हा झाडाची पाने सळसळायची. तिला वाटायचं झाड आपल्याला आईसारखं समजावून सांगतंय. कधी कधी ती वडिलांनापण सांगायची, 'झाड माझ्याशी बोलतं.' वडील हसून तिला जवळ घेत म्हणायचे, 'हो बोलत असेल हं झाड तुझ्याशी, सुमन. तुला लहानपणापासून बघतिलय ना त्या झाडाने. तुझी आईपण बोलायची झाडाशी. म्हणायची माझ्या कविताला सुखी ठेव. तिला जन्मभर सावली दे. तिला सांभाळ.' कविताच्या वडिलांनाही चिंचेच्या झाडाखाली गेले की वेगवेगळे भास व्हायला लागले. एकदा एक फांदी जोराने त्यांच्या समोर हलली. जगू रागाने ती काही सांगू पहात होती. तिची सावत्र आई झाडाखाली गेली तर एका दगडाला ठेचकाळून तिच्या पायातून रक्त यायला लागले. ती झाडाचा आणखीनच रागराग करू लागली.
आता कविता बराच वेळ झाडाखाली बसू लागली, झाडाखालीच ती अभ्यास करू लागली. तिची सावत्र आई तिला खसकन झाडाखालून ओढत घरी ओदन नेत असे. झाडाला नावं ठेवत असे. सावत्र आईला पैसे खर्चायची सवय होती. सारखी दागिने करत असे वा कपडे खरेदी करीत असे. घरात पैसा कमी पडू लागला. सारखी सुमनला नावे ठेवायला लागली. ही कार्टी दळभद्री आहे. आईला खाल्लं आता मला संपवणार. हिच्यामुळे घराला दारिद्र्य आलं, असं काहीही बोलू लागली. असेच दिवस जाऊ लागले. वडील कविताला कधी कधी जवळ घेत. ते पाहून सावत्र आईचा जळफळाट व्हायचा. ही पोरगी घरातून गेल्याशिवाय आपल्या जीवाला शांती मिळणार नाही, असं तिला वाटायला लागलं आणि ती संधी शोधू लागली. पावसाळ्याचे दिवस आले. माळरानावर धो धो पाऊस पडू लागला. एक दिवस घरात सावत्र आई, कविता आणि तिचे वडील बसले होते. मुलगा त्याच्या आजोबांकडे परगावी गेला होता. बघता बघता काळे ढग जमा झाले. सगळीकडे अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. कविता घावरून कोपऱ्यात एकटीच बसली. सावत्र आई रागाने सुमनकडे बघत होती. वडील काळजीने बाहेर बघत होते. विजांचा कडकडाट वाढायला लागला आणि सरकन एक बीज घरावर कोसळू लागली, तशी सावत्र आई किंचाळली. 'या पोरीमुळे विजा कोसळतायत घरावर. हिच्यामुळेच संकटं येत आहेत आपल्यावर. हिला बाहेर काढा, नाही तर घरावर वीज कोसळून आपण सगळेच मरून जाऊ. हिच्यामुळेच बीज कोसळत आहे घरावर. अगोदर या पोरीला बाहेर काढा.' 'अगं एवढ्या पावसात तिला घराबाहेर कसं काढायचं? कुठे जाईल ती ?' 'आहे ना तिचं लाडकं झाड समोर. ढकला तिला झाडाखाली. फार गप्पा मारतं ना ते तिच्याशी, जा लवकर बाहेर काढा तिला. ती गेली झाडाखाली की आपल्यावरचं संकट टळेल. वीज इथे नाही कोसळणार. तिने सख्ख्या आईला खाल्लं, आता आपल्यालापण खाईल.' 'अगं, पण झाडावर वीज कोसळली तर आणि तिचा जीव गेला तर?' 'बोलतं ना ते झाड तिच्याशी, मग बोल म्हणावं. वाचव म्हणावं मला..... बघू वाचवतंय का... आपल्याला मारल्याशिवाय ती नाही मरणार. तिचा नाही गेला जीव तर इथे आपल्या सगळ्यांचाच जाईल, लवकर काढा बाहेर तिला.'सावत्र आई जोरजोराने किंचाव्ययला लागली, तिच्या लक्षात आलं हीच संधी होती. सगळीकडे विजांचा कडकडाट वाढत होता. वडिलांनी नाईलाजाने कांबळं काढलं. कविताच्या डोक्यावर टाकलं आणि तिला ओढत ते चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेले. ती ओरडत होती, 'नको नको, पाऊस लागतोय', पण वडील तिरीमिरीतच होते. चिंचेचं झाड शांतपणे पावसात उभं होतं. सुमन झाडाखाली जाऊन थरथरत उभी राहिली. 'चिचदादा वाचव मला म्हणू लागली.' वडील तिला सोडून जाऊ लागले, तोच प्रचंड कडकडाट होऊन विजेचा प्रचंड लोळ त्यांच्या घरावर पडला आणि क्षणार्धात घराने पेट घेतला. वडिलांचं धाडसच झालं नाही आत जायचं. ते थरथर कापत उभे होते. नकळत त्यांनी चिंचेच्या झाडाला हात जोडले. एवढा पाऊस असूनही झाडाची सळसळ त्यांनी ऐकली. कविता झाडाजवळ गेली. तिला वाटलं आईच आपल्याला जवळ घेतेय.