साडेआठशे वर्षांपासूची ऐतिहासिक परंपरा लाभलेली ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची गड्डा यात्रा. खरेतर या यात्रेने शहराची वेगळी ओळख निर्माण केली.व शहाराची शान आहे. दरवर्षी होम मैदानावर भरणारी ही आगळीवेगळी यात्रा, त्यासाठी श्रद्धेने येणारे लाखो भाविक तसेच हौसे, नवसे, गवशांची गर्दी. नंदिधवजांची मिरवणूक आणि त्या संपूर्ण रस्त्यावर संस्कार भरती विद्यार्थीच्या तर्फे घातली जाणारी मनमोहक ,रांगोळी .यानिमित्ताने होणारी शहराच्या विविध भागांतील ६८ लिंगाची पूजा, या संपूर्ण कालावधीत सिद्धेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, होम मैदानात थाटली जाणारी दुकाने,उंच पाळण्यांचे फिरते चक्र, मौत का कुव्यासारख्या गोलाकार तंबूत मोटारसायकल चालविण्याचा जीवाचा थरकाप उडविणार शो, उसाच्या राडाची दुकाने,शोभेचे दारुकाम पाहण्यासाठी होणारी होममैदानावरील गर्दी , सिद्धरामेश्वरांच्या विवाहाचा अक्षता सोहळा ,यादरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी,प्रथा,परंपरा आणि नंदिधवज हाती घेणाऱ्या सर्व समाज बांधवांचा पांढरा शुभ्र पोशाख,आणि भावपुर्ण पद्धतीने केल्या जाणाऱ्या गोष्टी .या आणि अशा अनेक गोष्टींमुळे जवळजवळ एक महिनाभर संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण असते . केवळ ही भाविकांची यात्रा नसून यातून इथल्या श्रमजीवी कुटुंबातील अबालवृद्धांसाठी देखील मनोरंजनाची सोय असते.
केवळ सोलापूरतीलच नव्हे तर,शेजारच्या,आंध्र,कर्नाटकातून,लाखो भाविक येत असल्यामुळे हा धार्मिक सोहळा सांस्कृतिक अंगाने संपन्न होतो.ज्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.यांमुळे यात्रेचे वेगळेपण जपत हा सांस्कृतिक ठेवा जपला पाहिजे.किंबहुना ती आपली जबाबदारी आहे.इथल्या श्रमजीवी कुटुंबातील आबालवृद्धांसाठी हा सांस्कृतिक ठेवा अधिक समृद्ध करण्याची गरज आहे.जसे भक्तिभाव आणि श्रद्धेला यात्रेत स्थान आहे. त्याचबरोबरीने इथल्या श्रमिकांची सांस्कृतिक भूक भागविणारी गोष्टदेखील आहे.म्हणूनच कष्टकरुंची लहान मुलेही वर्षभर या गड्डा यात्रेची वाट पाहत असतात. गड्डा यात्रेत दिसणारी माणसांची गर्दी ,बालवयातील मुलांसाठी मनोरंजक असते. तसेच जादू,नकला,कसरतीचे खेळ, आशा आनंद देणाऱ्या गोष्टींमुळे आबालवृद्धांसाठी पर्वणीच असते. शहरातील पूर्व विभागातील दोन्ही घरकुले,अक्कलकोट रोड परिसर ,जुळे सोलापूर, हद्दवाढ भाग ,पुणे नाका अशा शहरांच्या चारी दिशांमधून झुंडीच्या झुंडी होम मैदानाकडे यात्रेत सामील होण्यासाठी जाताना पाहतो तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ,विरंगुळ्याची भावना ,मोकळेपणा तसेच शेजारच्या गावांमधून पायी चालत येणाऱ्या सांस्कृतिक भुकेलेल्यांसाठी ही जीवनदायी ऊर्जा चिरंतन टिकून राहिली पाहिजे.नवीन तांत्रिक आणि आभासी जगात हरवत चाललेल्या आजच्या पिढीतील लोकांसाठी एकत्रित येण्याची ही संधी नीटपणे वापरली पाहिजे.या यात्रे मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात .एवढेच न्हवे तर शेजारच्या कर्नाटक तसेच इतर राज्यातील अनेक गावांमधून बैलगाडी,ए स. टी बस तसेच स्वतःच्या गाड्या करून लोक नियमीतपणे दरवर्षी येतात,सिद्धरामेशवराचे दर्शन घेतात आणि भक्तिभावाने परत जातात.
यात्रेतील विविध कर्यक्रम - खरंतर इतर सर्व यात्रांसारखीच ही पण यात्रा भरते. सोलापुरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची ही यात्रा असते. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दरम्यान ही यात्रा भरते. संक्रांतीच्या आधी दोन दिवस यात्रा चालू होते व ती पुढे पंधरा दिवस चालते. तथापी यात्रेचा मुख्य दिवस हा मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस असतो. यात्रेत खेळणी, खाद्यपदार्थ, गॄहोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, व इतर मनोरंजनाची साधने भरपूर असतात. तसेच विशेष म्हणजे फार मोठा बैल बाजार या यात्रेच्या निमित्ताने भरवला .
१२ जानेवारी - सोलापूर परिसरातील श्री. सिद्धरामेश्र्वरांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना तेल घालण्याचा कार्यक्रम असतो. या वेळी मानाच्या सहा (काठ्या) नंदीध्वजांची मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली जाते. त्यासाठी बाराबंदीचा खास पोशाख असतो. हा सोहळा पुर्ण दिवसभर चालतो. या काठ्या (नंदिध्वज) घेऊन चालणे हे अत्यंत कठीण काम आहे कारण उन्हात अनवाणी पायाने चालावे लागते. याची प्राक्टीस एक महिना आधीच चालू होते.
१३ जानेवारी -हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी अक्षता विधी असतो. श्री. सिद्धरामेश्वरांचा लग्नविधी या दिवशी पार पडतो. हजारो भाविक बाराबंदीच्या पोशाखात लग्नासाठी उपस्थित असतात.
१४ जानेवारी - या दिवशी होम हवन करण्यात येते. मंदिराच्या समोरील होम मैदानावर याची खास व्यवस्था केलेली असते.
१५ जानेवारी - या दिवशी शोभेचे दारुकाम केले जाते. रात्री होम मैदानावर हा सोहळा आयोजित केला जातो. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा भव्य सोहळा आवर्जून पहावा असा असतो. त्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात.