एक हृदयस्पर्शी लघुकथा

Vikas Jamdade
0

 लघुकथा

त्या भयानक अपघाताच्या कटू आठवणी मागे टाकून तब्बल ६ महिन्यांनी पूजा आपल्या नवऱ्यासोबत समीरसोबत गावाला निघाले होते. लग्नानंतर दोघांनी मिळून घेतलेल्या इर्टीगामधून त्यांचा प्रवास सुरु होता. पहाटे लवकरच निघाले होते त्यामुळे ११ च्या सुमारास माणगावच्या मागे हॉटेल ओपन आंब्रेलामध्ये मस्त नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी निघाले."समीर, आता मला चालवू दे ना.""नाही पूजा. तुला गाडी चालवायची नाहीये. डॉक्टरांनी तसे बजावले होते.""अरे पण डॉक्टरांनी फक्त ४ महिने चालवू नको सांगितली होती.""असू दे, तुझ्या अजूनही पोटात दुखते ना अध्येमध्ये." समीरने गाडीचा वेग वाढवला."समीर, ६ महिने झाले आता. जुन्या गोष्टी नको ना उगळू.""अग.""दे ना.""नाही बोललो ना." समीरने ५ वा गिअर टाकला."थोडी चालवू दे.""६ महिन्यांपूर्वी गाडी नेली असतीस तर आज हे असे.........." समीर बोलता बोलता गप्प झाला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. "सॉरी.""इट्स ओके, नवरा आहेस माझा. हक्क आहे तुझा. सॉरी नको बोलूस पण त्यावेळी मी एवढ्या लांब गाडी चालवत नेऊ शकलो नसतो. त्यात सीट बेल्ट लावता येणार नव्हता मला.""जाऊ दे तर सगळं. माणगावला ट्रॅफिक नको मिळू दे म्हणून पळवतोय गाडी." समीर डोळे पुसत बोलला.मुंबई गोवा महामार्ग आता चौपदरी झाला होता त्यामुळे गाडी सुसाट होती."गाडी थांबावं लवकर समीर, थांबव."समीरने अंदाज घेत गाडी थंबवली."काय झालं?""आताच्या आत मागे घे गाडी.""काय झालं? काही राहील का हॉटेलमध्ये?""नाही. तू मागे घे गाडी.""अग हो पण डिव्हायडर नको का ओलांडायला. पुढे असेल कुठेतरी.""नाही. इथेच वळवून घे नाहीतर उलट चालव गाडी.""अग."ती वैतागली आणि गाडीतून उतरली. सोबत पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन धावत मुंबईच्या दिशेने निघाली. समीरला कळेच ना काय होतंय ते. तो पण पटकन उतरला आणि तिच्या मागून धावू लागला. पुढे लक्ष गेल्यावर त्याला दिसलं की समोर हायवेच्या बाजूला एक रिक्षा बंद उभी होती जीच एक चाक निखळून गेले होते. रिक्षात एक म्हातारी, एक बाई आणि ५ वर्षांचा मुलगा होता. तो धावत रिक्षाजवळ गेला. पूजासुद्धा पोहचली होती. आत पाहिले तर ती बाई पोटुशी होती आणि म्हातारीच्या मांडीवर तिने डोके ठेवले होते. तो ५ वर्षांचा पोरगा रडत ओरडत होता, "आई, काय होतंय तुला. आई बघ ना माझ्याकडे."म्हातारी सुद्धा ओरडत होती,"स्वामी कुठाय तुम्ही. माझ्या सुनेला वाचवा हो."परिस्थितीच गांभीर्य ओळखून समीर तसाच आपल्या गाडीकडे धावत सुटला. इकडे पूजाने म्हातारीला धीर द्यायला चालू केल."आई, काय झालंय? बोला माझ्याशी.""पोरी ही माझी सून हाय, नऊ महिने पूर्ण झालेत. सकाळी पोटात दुखत होत बोलत होती म्हणून हॉस्पिटलमध्ये जायला निघालो होतो. तर बाथरूममध्ये पाय घसरून पडली ओ." म्हातारी जोरजोरात रडायला लागली."ए ताई, डोळे उघड. डोळे नको मिटू, ए ताई." पूजा त्या म्हातारीच्या मांडीवर डोके ठेवलेल्या पोटुशी बाईच्या गालावर मारत तिला डोळे बंद करून देत नव्हती."रिक्षा केली जायला तर इथे आल्यावर तिचे चाक तुटले. माझा दुसरा नातू मला हवाय. काहीतरी करा ओ." म्हातारी आकांताने ओरडत होती. दुसरा नातू हा शब्द पूजाला खटकला."आई काही नाही होणार सुनेला तुमच्या. ए ताई हे घे पाणी पी. डोळे नको बंद करू." पूजाने तिला पाणी पाजले पण तिला पाणीही पिता ये नव्हतं. ती विव्हळत होती.एव्हाना समीर गाडी घेऊन पोहचला. "नक्की काय झालंय?""ते सगळं जाऊ दे समीर. इमर्जन्सी आहे. ताईला गाडीत घे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल."काहीही न बोलता समीर आणि पूजाने त्या बाईला उचलून आपल्या गाडीत बसवले. आजी आणि नातू सुद्धा बसले. पूजाने एकदम शॉर्टमध्ये सगळं सांगितलं. समीर म्हातारीचे सामान गाडीत ठेवत होता. पूजाने पटकन स्टीयरिंग आपल्या हातात घेतले आणि गाडी सुरू केली. समीर काहीच करू शकला नाही, गुपचूप पुढच्या बाजूच्या सीटवर बसला."आजी कोणत्या दवाखान्यात नाव नोंदवलं आहे?""पोरा सरकारी दवाखान्यात. माझ्या सुनेला वाचवा रे."समीरने पटकन gps मध्ये माणगाव सरकारी हॉस्पिटल डेस्टिनेशन टाकले."पूजा, १० किमी आहे.""देव करो आणि ट्रॅफिक न लागो.""नाहीये. इथे दाखवत नाहीये. पळव गाडी."गाडी वेग पकडते ना पकडते तोच दोन माणसे धावत पळत जाताना दिसली."माझा पोरगा आणि रिक्षावाला आहेत ते." मागून म्हातारी बोलली.पूजाने गाडी थांबवली. रिक्षावाला पटकन बोलला."भावजी तुम्ही जा. मी रिक्षा दुरुस्त करून घेऊन येईन."बाईचा नवरा गाडीत बसला आणि पाचव्या मिनिटाला गाडी हॉस्पिटलच्या दारात. तिथे पोहचण्याआधी समीरने नंबर शोधून तिथे कॉल करून कल्पना दिली होती. डॉक्टर आणि वॉर्डबॉय तिथे स्ट्रेचर घेऊन तयारच होते. गाडी थांबताच त्यांनी त्या बाईला स्ट्रेचरवर घेऊन ते सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.सगळी ऑपरेशन थिएटरसमोर होते."आई तुम्ही काही खाल्ले आहे का?""नाही.""काहीतरी खाऊन घ्या.""नको. बाळाला न्या, उपाशीच आहे ते सकाळपासून.""हो." समीरने त्या बाळाला उचलून घेतले आणि तिघे हॉस्पिटलच्या कॅन्टीनला गेले."बाळा तुझं नाव काय?""शिशिर.""वाह किती गोड नाव आहे.""हो मग, आजीने ठेवलंय माझ्या.""हो का, आणि आता मला भाऊ येणार त्याच नाव वसंत ठेवणार आहे आजी.""तुला कोणी सांगितलं भाऊ येणार आहे.""आजीचं बोलली. तुला ना भाऊ येणार आहे. बहीण आली तर आईला तिच्या घरी पाठवून देऊया."पूजा निशब्द झाली. ती त्याला भरवत होती आणि अचानक त्याचे वडील धावत आले."दादा, ओ निगेटिव्ह रक्त हवंय सांगत आहेत. रक्तपेढीत फोन केलेला पण नाहीये.""माझे आहे ओ निगेटिव्ह, चला." पूजा ताडकन उठली.ती आत गेली रक्त द्यायला. थोड्यावेळाने ती म्हातारी आणि शिशिरचे वडील आले. "दादा, तुम्ही होता म्हणून नाहीतर माझ्या बायकोचे काय झाले असते काय माहीत. डॉक्टरांनी सांगितले की तिची तब्येत स्थिर आहे पण अजून वेळ झाला असता तर ती आणि बाळ दोघेही गेले असते." तो रडू लागला."अहो रडू नका. खरतर माझे लक्ष नव्हतं. माझ्या बायकोने पाहिले म्हणून थांबलो. आभार तिचे माना.""त्या साक्षात देवी आहेत. त्यांनी रक्तही दिल माझ्या बायकोसाठी."हे ऐकून म्हातारी एकदम गलबलून गेली. तेवढ्यात पूजा रक्त देऊन पुन्हा तिथे आली."तुला कोणाची नजर ना लागो पोरी." म्हातारीने पूजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोट मोडली."काय झालं आई?""पोरी तू माझ्या सुनेला वाचवलेस. रक्तही वाचवलेस. तुझे उपकार कसे फेडू.""उपकार कसले. मला आशीर्वाद द्या बस झाला.""लवकर तुझ्या घरी पाळणा हलू दे."पूजा आणि समीरच्या डोळ्यात टचकन पाणी आलं."आई आशीर्वाद परत घ्या.""का ग पोरी? काय झालं.""आशीर्वाद वाया जाईल. जो आशीर्वाद पूर्ण होईल असाच आशीर्वाद द्या.""मला समजलं नाही.""आई, ६ महिन्यांपूर्वी मी ५ महिन्यांची गरोदर असताना अपघात झाला आणि माझं बाळ गेलं. मुलगा मुलगी कोण होत माहीत नाही पण त्यानंतर मी पुन्हा आई नाही होऊ शकणार...." तिने हुंदका गिळला.समीर सुद्धा डोळे पुसत होता"माफ कर मला पोरी, मला माहित नव्हतं.""अहो माफी कशाला मागताय. मी आई होणार नसले तरी आता आम्ही दोघे १२ जणांचे आई बाबा आहोत.""म्हणजे?""ही बघा आमची १२ मुलं. ८ मुली आणि ४ मूल." ती आपल्या मोबाईलमधले फोटो दाखवत बोलली."आणि बर का आई, आमच्या मोठ्या मुलीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. तुम्ही सगळ्यांनी यायच बर का?" समीरने एक पत्रिका म्हातारी समोर धरली."थट्टा करताय का माझी.""नाही आई. ही एका आश्रमातील मूल आहेत.""म्हणजे अनाथ आश्रम?""अनाथ नका म्हणू ओ. आम्ही आणि आमच्या सारखे अनेक आई बाबा आहेत त्यांना. सगळ्यात मोठीच लग्न आहे. त्याचीच पत्रिका ठेवायला गावाला निघालो होतो आम्ही."म्हातारीने पूजाला मिठी मारली. इतक्यात नर्स धावत आली."अभिनंदन, लक्ष्मी आली घरी तुमच्या. बाळ आणि आई दोघे ठणठणीत.""अभिनंदन." समीरने अभिनंदन केले. म्हातारी सुद्धा खूप आनंदी झाली. पूजा आणि म्हातारी दोघी बाळाला बघायला गेल्या आणि समीर हॉस्पिटलच्या बाहेर मिठाई मिळते का बघायला गेला.आता पूजा आणि म्हातारी बाहेर आले होते तर समीर बाहेर मिठाई वाटत होता. बाळाचे बाबा सुद्धा खुश होते. समीर आतमध्ये बाळाला बघायला गेला."पोरी, तुझ्यामुळे माझे डोळे उघडले.""म्हणजे?""मला नात नको हवी होती. वंशाचा दिवा हवा होता जो मला मिळाला होता पण तरीही मी खूप स्वार्थी वागले. माझ्या मुलाला आणि सुनेला सांगितलं होतं मुलगी झाली तर घरी यायची नाही. बिचारी सून माझी टेन्शनमध्ये असायची. त्यामुळेच आज विपरीत घडलं पण तुला पाहिल्यावर, भेटल्यावर वाटलं की मुलगी हवीच आणि मुलगीच झाली.""मी असे काय केले म्हणून तुमचं मत बदललं?""तुझा अपघात, त्यातून सावरणे, ही सुसाट गाडी चालवणं, पोटच पोर नाही म्हणून इतर १२ १२ पोर सांभाळणं. कुठून बळ आलं ग तुला इतकं?"

"आई, माझ्या घरी असो किंवा सासरी मला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी अडवणूक नाही झाली म्हणून मी अशी आहे. चला आता जायची वेळ झाली. आम्ही निघतो. पत्रिका तुम्हाला दिलेलीच आहे. त्यावर नंबर आहे. केव्हाही कॉल करा."पूजा गाडीत बसली आणि समीरसुद्धा बाळाला भेटून आला आणि गाडीत बसला."झाले सगळं, त्यांना कळायच्या आधी निघ." समीर बोलला."हो चल."म्हातारीचा निरोप घेऊन दोघे निघाले. तेवढ्यात म्हातारीचा मुलगा धावत बाहेर आला, त्याच्या हातात एक पाकीट होत."आई, थांबावं त्यांना.""काय झालं? इतका धावत पळत का आलास?""अग आई, त्या दोघांनी आपल्याला खूप मदत केली पण जाता जाता तो ही दोन पाकीट एक बाळाच्या हातात आणि दुसरं बाळाच्या आईच्या उशाजवळ ठेवून गेला .""कसली पाकीट आहेत?""हिच्या उशाशी जे पाकीट होत त्यावर 'बहिणीस भेट' असे लिहिले आहे.""काय आहे त्यात?""स्वामी चरित्र." "आणि बाळा जवळच पाकीट.""त्यावर 'प्रिय भाचीस' एवढेच लिहिले होते आणि आतमध्ये २०,००० रुपये आहेत." त्याचे डोळे पाणावले.म्हातारीला सुद्धा भरून आले. दोघांनी गेटच्या बाहेर जाणाऱ्या त्या इर्टीगाला बघत होते. त्यावर मागे मोठ्या अक्षरात लिहिले होते .............भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

🙏धन्यवाद

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*