गावाकडची पंगत पद्धत काय असते

Vikas Jamdade
1

 

वाड्यातील पंगत (पाट मांडून जेवणाची पद्धत)पूर्वी स्वयंपाक घराची पद्धत वेगळी होती. अन्नपूर्णेचा मिळालेला वरदहस्त आणि स्वयंपाक करणाऱ्यांचे ओतपोत भरलेले प्रेम. स्वयंपाकघराच्या भिंतीत कपाटे, ताकाचा खांब, चुलीजवळ खिडकी, घागरींचा कट्टा, गाडग्या उतरंडीचा कट्टा, पिंपाचा कट्टा, चुलीजवळ राख ठेवायला खड्डा, स्वयंपाक करताना चुलीतील गरम राख बाहेर काढत रहायचं अन त्या गरम राखेवर कायम दुध, भाजीचे पातेल ठेवायचे. त्यामुळे कुठल्याही वेळेला गरमागरम स्वयंपाक मिळायचा. चुळा भरायला पायावर पाणी घ्यायला कोपऱ्यात दगडी मोरी. स्वयंपाकघरातील ओला कचरा एका ठराविक ठिकाणी साठवला जाई. हया कचऱ्यावर केळी, अळू अशी पिके वाढवतात. जेवणानंतर हात धुण्यासाठी ज्या जागेचा उपयोग करतात तेथे आपोआपच केळी व अळूला पाणी मिळते. पाणी साठवण्यासाठी भला मोठा रांजण. एका बाजूला न्हाणीघर, न्हाणीघर देखील घडीव दगडांचे. धूर कोंडू नये म्हणून छताला उजेड येण्यासाठी आणि चुलीचा धूर जाण्यासाठी सानं असतं. चुलीच्या जवळ बाजूलाच स्वयंपाकासाठी लागणारे लाकूडफाटयाचा ढीगही सदैव रचून ठेवलेला असे. पूर्वी मिक्सर नसायचे तेव्हां पाटा वरवंटा यांचेच राज्य स्वयंपाक घरात असायचे. पाट्यावरील रांधलेल्या जेवणास कशाचीही चव येणार नाही. लसूण खोबऱ्याची चटणी, दाण्याचे कुट, शेंगदाण्याची चटणी, बनवण्यासाठी उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई. अतिशय कलात्मकरित्या सजवलेल स्वयंपाकघर, शेणाने सारवलेली जमीन, U आकाराची जेवणाची बैठक व्यवस्था. आढ्याला टांगलेली ज्वारीची, मक्याची कणसं. लसून कांद्याच्या जुड्या. उजेडासाठी टांगलेले काचेचे कंदील. भिंतीवर देवदेवतांचे मनमोहक भित्तीचित्रे, अशा उपयोगात येणाऱ्या अनेक वस्तू जसे की रांजण, मातीची चूल, सूपडी, दगडाचे जाते, उखळ, खलबत्ता इत्यादी वस्तू व्यवस्थित मांडून ठेवलेल्या असत. या सगळ्या वस्तूंचा, चित्रांचा अन सजावटीचा एकत्रित परिणाम त्या जेवणाच्या खोलीची शोभा द्विगुणित करतात. पूर्वीच्या वाड्यातील जेवणाच्या पंगतीत एक शान असायची. जेवतांना चित्तवृत्ती प्रफुल्लित असावी म्हणून बसायला लाकडी पाट, जेवण्यासाठी समोर चौरंग. चौरंगावर तांब्या पितळेची ताटवाटी, ताटाच्या बाजूला तांब्या फुलपात्र, पाटाभोवती रांगोळी, उदबत्त्यांचा घमघमाट. कोनाड्यात लावलेले दिवे, पितळी समईच्या मंदसा प्रकाशाने वातावरण उजळून टाकले जाई. आता पूर्वीच्या मेन्यूकडे येऊ, मेन्यूचे वैशिष्ट्य असे की, सगळा मेन्यू घरगुती अजूनही एवढ्या वर्षांनंतरही कोणत्याही हॉटेलात सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारा. म्हणजे ताटाच्या बाजूला शेंगदाणे गुळाची छोटीशी वाटी, ताटात मीठ, लिंबू, दोनतिन प्रकारच्या चटण्या, लोणचं, डांगर, भरीत, वांग, पिठलं, कुरडई-पापड, ज्वारीची-बाजरीची भाकरी, वरणभात, तूप, वेगवेगळ्या दोनतिन भाज्या, आमटी, ताक, दुध असा फक्कड बेत असे. जेवणाचे एकूण एक पदार्थ हटके. जसे की जितवडा, हे नाव शहरातील किती जणांनी ऐकलं असेल आणि किती जणांनी हे खाल्लं असेल देव जाणे. जितवडा हा रात्री भिजवलेल्या हरभरा डाळी पासून बनवलेला असतो, तो नुसताच खायलाही छान लागतो. आणि त्या वड्या बरोबर असतो  तांबडा गरमगरम झणझणीत रस्सा, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि सोबत ज्वारीची भाकरी, ज्वारीची भाकरी रस्स्यात मुरगळायची, त्या घासाचा भुरका मारायचा अन त्यामागोमाग जिभेवर हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा प्रसाद ठेवायचा. ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा. सोबत कांदा लिंबू वगैरे असतेच. बाजूला छानसं रसाळ चविष्ट वरणही असतं. मनसोक्त भाकरी मुरगळून झाल्या की मग यायचा भात. नुसते ओरपणे या पलीकडे कसला विचारचं करायचा नाही. अजिबात हयगय करायची नाय. डोळ्यातून आणि नाकातून पाण्याची धार निघाली की गृहिणींना जेवणाची पोचपावती मिळाली असं समजायचं.अजून एक भन्नाट मेन्यू म्हणजे आळूवडी. हे सगळे पदार्थ आळूच्या पानाचे असतात. आळूच्या वड्या, आळूची भाजी आणि आळूच्याच वड्यांची पांढऱ्या रस्स्यातली आमटी. विविध प्रकारचे पिठले, वेगळ्या प्रकारची रसरशीत झणझणीत सांडग्याची भाजी, मसालेदार मासवडी, पुरणपोळी असे हे पारंपरिक पदार्थ जेवणात असत.  यजमानांनी वदनी कवळ घेता ची सुरुवात केली आणि सर्व अतिथीनी त्या आवाजात आवाज मिळवला की जेवणाला सुरवात झाली हे स्वयंपाकघरात कळायचे. अशा या सगळ्या पंगती प्रपंचात एक जिव्हाळा होता. वाढणारा अन जेवणारा यांच्यात एक संवाद असायचा. वाढणाऱ्याचे पंगतीवर लक्ष असायचे. जेवणाऱ्याला काही मागायची वेळ येत नसे. तृप्तीची ढेकर देत ‘अन्नदाता सुखी भव’ असे आशिर्वाद देत अतिथी उठत असत.अलीकडे बुफ्फे पद्धत सुरु झाली आणि पंगतीची मजाच गेली. पूर्वी जेवणारे एका जागी बसायचे आणि वाढपी वाढत फिरायचे. आता उलट झाले आहे. वाढपी एका जागी उभे राहतात आणि खाणारी मंडळी हातात ताट सांभाळत फिरतात. जेवणाची जी मजा पाटावर मांडी घालून बसण्यात आहे ती बुफ्फेमध्ये उभे राहून जेवण्यात नक्कीच नाही एवढे मात्र खरे!जेवण करून यजमान तक्क्यालोडांना टेकून किंवा जमिनीवर घोंगड्या टाकलेल्या असत, त्या उबदार घोंगडीवर पाठीमागे असलेल्या तक्क्याला टेकून बसले की सगळा शरीराचा शीण गायब व्हायचा. घोंगडीवर बसल्यावर इतकं आरामदायी वाटत की मन प्रसन्न होऊन जात. मुखशुध्दीसाठी सजलेल्या पानदानातून अलगद सुपारी काढून अडकित्त्यात कातरून तोंडात टाकी. विडयाची पाने, चुना, कात, सुपारी, केशर, गुलकंद, लवंग, वेलदोडा, गुंजांची पाने, बडीशेप, इत्यादी पासून विडा बनवून खात असत.आजच्या जमान्यात हि गावाकडील पंगत संपली.व  शहरांत आपुलकी नसलेली नवीन पद्धत निर्माण झाली जर हि पोस्ट आवडली तर शेअर व लाईक करा धन्यवाद 🙏

एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*